Maharashtra to Ayodhya Ram Mandir : कैक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु होते. अखेर 2024 या वर्षी अयोध्येत राम लल्ला खऱ्या अर्थानं मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. साधू, महंत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यामुळं अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातून अनेकांचेच पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आणि पाहता पाहता परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली. देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. इतका की, अवघ्या साडेपाच तासांत पर्यटक आणि भाविकांना रामलल्लाच्या अयोध्यानगरीत पोहोचता येणार आहे. 


निमित्त ठरतंय नाशिक-लखनऊ फ्लाइट...


राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. यापूर्वी रेल्वेने इथं पोहोचण्यासाठी साधारण 21 तास लागत होते. आता मात्र इंडिगोनं (Indigo) याकरिता 72 आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं असून नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊर्यंत केल्याने नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज नाही. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईवर तोडगा निघणार, राज ठाकरे काय भूमिका मांडणार? राजकीय वर्तुळातील घडामोडी एका क्लिकवर 


नाशिक विमानतळावरून दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास 3700 ते 4200 रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळं अनेकांनाच ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत. 


या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार हे नक्की.