पुलावर पाणी आल्याने त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता बंद
रस्ता बंद केल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता पुलावर पाणी आल्याने त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या २४ तासांपासून नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे गोदावरीने उगमापासून रौद्र रूप धारण केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या रामकुंडावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात दमदार झालेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर पूर्णत: जलमय झाले आहे. घराघरात पाणी घुसले असून अनेक कार, दुचाकी पाण्यामध्ये आहेत. गोदावरीच्या उगम स्थानी काँक्रिटीकरण केल्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली. शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पाणी शहराबाहेर जाण्याऐवजी साचतंय, त्यामुळे नागरिकांना आणि भाविकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे, ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगांमधला प्रत्येक धबधबा खळाळून वाहत आहे.
धरणांच्या परिसरातही दमदार पाऊस सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणात २६ टक्के, भावलीमध्ये ३४ टक्के, तसंच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामध्ये १६ आणि कश्यपी धरणात ९ टक्के पाणीसाठा झाला आहे.