किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात तसं सूतोवाच केलं. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र मेट्रोवरून भाजप महाविकास आघाडीवर टीका करतं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोवरून चांगलाच वाद उफाळून आल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार बदललं की धोरण आणि प्रकल्पही बदलतात आणि त्याचाच प्रत्यय आता येऊ लागलाय. भाजप शिवसेनेचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाशिकच्या नियो मेट्रो प्रकल्पासह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या शासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना भुजबळ यांनी राज्यातील मेट्रो प्रकल्पांच्या गरजेबाबत प्रश्न उपस्थित करत, या प्रकल्पांवर टीका करत अप्रत्यक्षपणे विरोध केला.


'मी स्थगिती द्या असं म्हणत नाही, पण तज्ज्ञांना घेऊन विचार करा असं म्हणालो होतो. नागपूरच्या परिस्थितीची काय झालीय, मुंबईची मोनो रेल फेल झालीय. माझा विकास कामांना विरोध नाही, मी विकास करणारा आहे. त्यामुळे लोकांची गरज पाहून काम करायला पाहिजे, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.


तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही छगन भुजबळ यांच्या विधानाचे समर्थन करत या प्रकल्पाची गरज नसल्याचं मत व्यक्त केलंय. 'भाजपनं मुळात निवडणुका डोळयासमोर ठेऊन मेट्रोची घोषणा केली होती. हा चुनावी जुमला होता. मुळात स्मार्ट प्रकल्पांची काय अवस्था करून ठेवलीय. मेट्रोची काय करणार आहे. भुजबळ म्हणाले ते खरं आहे. कराचा बोजा नाशिककरांवर पडेल. फायदा काय होईल याचा विचार केला पाहिजे', असं नाशिक महापालिकेतले विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले आहेत.


छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर भाजप आमदारांनी मात्र ही महाविकास आघाडी नसून महास्थगिती असल्याची टीका केलीय. हे प्रकल्प न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिलाय.


'शहरातील वाहतूक आणि शहराचा विकास करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. मेट्रो देखील गरजेची आहे. वाहतूक कोंडी होत असताना शहराचा विकास करत असताना मेट्रोच काम व्हायला पाहिजे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक कामांना स्थगिती देत आहे. महाविकास आघाडीचे सरकार नसून महास्थगिती सरकार आहे. मेट्रोला स्थगिती दिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे.


महाविकास आघाडीचे सरकार आल्यानं अनेक प्रकल्पांना स्थगिती देणार असल्याची चर्चा सुरू असतांना, आता नाशिकसह राज्यातील मेट्रो प्रकल्पाहुन राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.