Virar Jivdani Mandir : राज्यभरात नवरात्र उत्सवाची धुम पहायला मिळत आहे. मुंबईजवळ असलेल्या विरारच्या जीवदानी माता मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र, विरारच्या जीवदानी मंदिराबाहेर भाविकाचा मृत्यू झाला आहे. देवीचे दर्शन घेण्याआधीच या भक्ताने प्राण सोडले. या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार येथील श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे‌. देविदास माली असं मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे.


नेमकं काय घडलं? 


अंधेरी पश्चिम, गुलमोहर रोड, डुगरे चाळ येथील देविदास भवरलाल माली (वय 41) आणि त्याचा मित्र दुर्गाशंकर मनैरीया याच्या सोबत रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. पायऱ्यांच्या मार्गाने गड चढत असताना अर्ध्या वाटेवर देविदास याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले.  ‌काही क्षणात देवीदास याची शुद्ध हरपली यानंतर इतर भाविकांच्या मदतीने त्याला ट्रेन द्वारे पायथ्याशी आणण्यात आले. यानंतर रुग्णवाहिकेतून विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात आणि नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रविवारी विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


लाखो भाविकांनी जीवदानी गड फुलून गेला


नवरात्रीनिमित्त विरारच्या जीवदानी गडावर भाविकांची देवीच्या दर्शनासाठी  गर्दी पहायला मिळत आहे. रविवार असल्यानं लाखो भाविकांनी जीवदानी गड फुलून गेल्याचं चित्र दिसून आलं. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. 


दांडिया आयोजकांना मंडपाबाहेर प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक 


राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. दांडिया खेळताना लोकं देहभान हरपून नाचतात मात्र अशाचवेळी हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना अनेकदा घडल्यात. अशी घटना घडल्यास दांडियाप्रेमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी आता आयोजकांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत