मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांचा आज (सोमवारी) ६०वा वाढदिवस. मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढऋदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्य सध्याच्या घडीला एका आव्हानात्मक सत्रातून जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. अशा या राज्याच्या नेतृत्त्वाला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar अजित पवार यांनी आपल्या अनोख्या आणि तितक्याच लक्षवेधी अंदाजात शुभेच्छा दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. तर, या वाहनाची स्टेअरिंग अर्थात ते चालवण्याची जबाबदारी ही खुद्द अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. 


हा अतिशय लक्षवेधी आणि तितकाच बोलका फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे'.





सध्या सुरु असणारा कोरोनाविरोधातील लढा जिंकत पुरोगामी आणि प्रगत विचारांच्या या महाराष्ट्र राज्याला पुन्हा देशात अग्रस्थानी आणू, असा विश्वास अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी व्यक्त केला. महाविकास आघाडीची राज्यात असणारी सत्ता आणि त्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या भूमिका पाहता पवारांनी पोस्ट केलेला हा फोटो बरंच काही सांगत आहे, असा अनेकांचा तर्क. तेव्हा आता निमित्त काहीही असो, इथं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमवेत अजित पवारांचा राजकीय वर्तुळातील वावर आणि त्यांचा हा अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे हे मात्र नाकारता येणार नाही.