पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट लिहिल्यानंतर त्याचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनीही केतकी चितळेला खडे बोल सुनावले आहेत. केतकी चितळेला मानसिक उपचारांची नितांत गरज आहे, एका चांगल्या दवाखान्यात नेऊन त्यांना उपचार दिले पाहिजेत अशा शब्दात अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. 


'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे, हे जे काय बोलतायत ती एक विकृती आहे, अशा पद्धतीने कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही'


राजकीय वेगळे विचार असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, आणि सत्ताधारी असोत किंवा विरोधक असू दे अशापद्धतीने वक्तव्य करणं चुकीचं आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो असं अजित पवार यांन म्हटलं आहे.


औरंगाबजेब कबरीवरुन सुरु झालेल्या वादाला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचंही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहु, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, आपल्या पुढे आता वेगळे प्रश्न आहेत. जी व्यक्ती तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी गेली, तो विषय आता उगाळून काय फायदा, काही लोकांनी जाणीवपूर्वक बाहेरुन यायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही अशा प्रकारचं कृत्य करायचं हे बरोबर नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, 


कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहेत, त्यावेळी  इतरांनीही जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी केलंय.