राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, विरोधात कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्ज दाखल करताना फक्त राष्ट्रवादीचेच नेते उपस्थित होते. शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन पक्षात नाराजी असल्याचं विचारण्यात आलं असता त्यांनी हे धादांत खोटं असल्याचं सांगितलं. "निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपली मतं, भूमिका मांडत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणीवर मला भाष्य करायचं नाही. मी फक्त विकासात लक्ष घातलं आहे. विकास करत आपला जिल्हा, राज्याला अधिक महत्व कसं देता येईल, काम मार्गी लागतील आणि याच निमित्ताने पुन्हा नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला महायुतीला सामोरं जाता येतील यासाठी माझा प्रयत्न आहे", असं अजित पवार म्हणाले आहे. तसंच मला चिंतनाची गरज नसते असा टोलाही लगावला. 


पुढे ते म्हणाले की, "छगन भुजबळ नाराज आहेत हे धादांत खोटं आहे. काही माहिती नसताना उगाच बातम्या पेरण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी स्वत: आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनीही सांगितलं आहे. तरीदेखील विरोधक किंवा मग फारच जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या तसुभऱही खऱ्या नाहीत. पार्लमेंट्री बोर्डाने एकत्रित बसून हा निर्णय घेतला आहे". 


महायुतीत एकटे पडल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचं निधन झालं असल्याने त्यांना नाशिकला जायचं होतं. दोन, तीन दिवस ते तिथेच असणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांना मी आदल्या रात्रीच वर्षावर भेटलो होतो. आज रात्री किंवा उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव ठरेल, आम्ही सर्वजण जाऊन फॉर्म भरणार आहे. सगळ्यांनी जावं असं मला वाटत नसल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले काही हरकत नाही तुम्ही जाऊन फॉर्म भरा. तरीदेखील शिवसेना शिंदे गट, भाजपा नव्हते अशा चर्चा रंगल्या. जर मी बोलावलेलंच नाही आणि एखादी व्यक्ती दुखात असताना आपण फॉर्म भरायला चला म्हणणं मला योग्य वाटलं नाही. ही निवडणूक बिनविरोधच होणार होती. फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ उपस्थित होते. चौघांनाच आत प्रवेश असतो त्यामुळे ते आत गेले". मला कोणाच्याही टीकेवर बोलायचं नाही असं सांगत त्यांनी जास्त भाष्य कऱणं टाळा.