अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून शिवसेना (Shivsena) नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. शिंदे गटातील नेत्यांनी आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्दा बाजूला केल्यानं आणि शिवसेना आमदारांना निधी वाटपात डावलल्याने हा निर्णय घेतल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्तानाट्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्रात जे घडलं त्याचे हे खरं कारण वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.


मला लोकांत राहून काम करायला आवडते. मी नेता नाही कार्यकर्ता आहे. नेत्यानं लोकांच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं असतं. महाराष्ट्रात जे घडलं ते खरं कारण वाटत नाही. तसं असतं तर चर्चा झाली असती. आता कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अशा प्रकारची कारणे सांगितली जात आहेत, असे रोहित पवार म्हणाले.


शिवसेना कोणी फोडली ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. त्यामागील कलाकार कोण आहे हेही त्यांनी सांगितलं. ती कला त्यांच्याकडेच आहे, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमिट्या शरद पवार यांनी बरखास्त केल्या आहेत. त्यामागे काय भूमिका आहे, ते मला माहिती नाही. परंतु आज राज्यात युवकांना ताकद देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पक्षाकडून युवकांना संधी दिली जाते की नाही पहावे लागेल. मला तशी अपेक्षा आहे, असे रोहित पवार म्हणाले.


ज्या उद्देशाने महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती तो उद्देश सत्ता संपुष्टात आल्याने राहिलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सत्ता म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात नाही. परंतु महाविकास आघाडी संघटन म्हणून अस्तित्वात असायला पाहिजे असं अनेकांना वाटतं. पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाहीत. मात्र स्थानिक परिस्थिती घेऊन निर्णय घेतले जातील, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.


शिवसेना कोणी फोडली?
"शिवसेना पुन्हा एकदा मजबूत होत असल्याचे पाहून शिवसेना राष्ट्रवादीने फोडली, शरद पवार अजित पवार यांनी असे आरोप केले जात आहेत. प्रत्यक्षात आज आदित्य ठाकरे यांच्या ग्रामीण भागातील दौऱ्याला शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी शिवसेना फोडल्याचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं जात आहे.  शिवसेना फोडण्यामागचे कलाकार सगळ्या जगाला माहिती आहेत," असे रोहित पवार म्हणाले.