नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जिल्ह्यात आतापर्यत 77 टक्के पेरणी झाली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने ही पेरणी धोक्यात आली आहे. पिकं संकटात सापडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. विहिरीच्या पाण्याने गाठलेला तळ, पावसाअभावी पिकांनी टाकलेल्या माना आणि डोक्याला हात लावून आकांशाकडे एकटक बघणारा शेतकरी ही परिस्थितीय मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात सलग 2 आठवडे पाऊस झाला पण हा पाऊस फक्त दोनच तालुक्यात कोसळला. उर्वरीत 6 तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. त्यावर शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन पिकांची लागवड आणि पेरणी केली. पण आता पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाच्या पिकांची दुरावस्था झाली आहे. पिकं अक्षरशः करपत असून पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. 



अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात 50 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. शेतकऱ्यांनीही कपाशीची लागवड केली. पावसाचा भरवसा नाही म्हणून ठिंबक देखील केले. त्यावर बियाणे, मजुरी, खतं असा हजारो रुपयांचा खर्च केला गेला. सध्या शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. ठिंबकने पाणी देण्याइतकही विहिरीत पाणी नाही. त्यामुळे कपाशी जमिनीवर माना टाकू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी करपली म्हणून कपाशीच्या शेतात ट्रॅक्टर घालून कपाशी उखडून टाकली आहे. जालना जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 20 टक्के इतका पाऊस झाला. त्यावर जिल्हाभरात  77 टक्के पेरणी झाली. पण पाऊस आजघडीला नसल्याने पिकं जगवायची कशी ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.