आता संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी, जनजागृतीसाठी रॅली
देशात उद्यापासून प्लास्टिक बंदी अमलात येणार आहे.
नागपूर : देशात उद्यापासून प्लास्टिक बंदी अमलात येणार आहे. प्लास्टिक बंदीच्या यशासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असल्यामुळे विविध शाळांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. मात्र, या बंदीचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही. व्यापारी, दुकानदारांचा विरोध होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दाखविण्यापुरती कारवाई झाली. परंतु त्यानंतर आजही सऱ्हास प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्लास्टिक बंदीचा फज्जा उडालेला दिसून येत आहे.
आज नागपुरात नूतन भारत शाळेच्या विद्यार्थ्यानी प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी रॅली आयोजित केली होती. प्लास्टिकचे पर्यावरणाला काय धोके आहेत याबाबत घोष वाक्य असलेले बॅनर्स हातात घेऊन शेकडो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शहरातल्या चौका चौकात पथनाट्यही सादर करण्यात आले. आता देशात प्लास्टिक बंदी लागू करण्यात येत असल्याने त्याची किती अमलबजावणी होती, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्लास्टिक बंदीनंतर कडक कारवाईचे धोरण अवलंबले असते तर प्लास्टिक मुक्ती झाली असती. मात्र, प्लास्टिक बंदीनंतर कापडी आणि कागदी पिशव्यांना मागणी वाढल्याची दिसून येत आहे. अनेक दुकानात प्लास्टिक बॅग मागू नये, असे बोर्ड पाहायला मिळत आहेत.