एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ, अधिसूचनेला मंजुरी
याविषयीची अधिसूचना आज विधानसभेत मंजूर करण्यात आली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीची अधिसूचना आज विधानसभेत मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हद्दीवाढीची अधिसूचना मांडल्यानंतर सत्ताधारी आमदारांसह, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या आणि ही अधिसूचना मंजूर करण्यात आली.
एमएमआरडीएच्या हद्दीत वाढीसंदर्भात यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. मात्र त्यात आणखी वाढ करण्याच्या अनुषंगाने त्याविषयीचा ठराव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडला.
या सुधारीत ठरावानुसार मुंबईतील भाग हा आता उक्त प्रदेश ठरविण्यात आला आहे. याशिवाय रायगड जिल्ह्याचा अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, पालघर तालुका, वसई तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील भाग वगळता उर्वरीत भागाचा उक्त प्रदेश अशी विभागणी करण्यात आली असून या भागांचा जलदगतीने, योग्य आणि सुव्यवस्थित विकास करता येणार आहे.
त्याचबरोबर शेलू ते कळंबोली तर्फ वरेडी आणि ताकवे, भालीवडी, सावेळए, हेदवली, मांडवणे, भिवपूरी (कँम्प), हुमगांव, साईडोंबर, ढाक, साल्फे, खरवंडी ते चोची गावापर्यंत आणि नंतर खालापूरची पूर्व सीमेच्या भागाचा समावेश एमएमआरडीएच्या हद्दीत करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या अधिसूचनेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी इतर शहरांसाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. एमएमआरडीएच्या धर्तीवर नागपूर, पुणे, नाशिक ठिकाणी संस्था स्थापन करण्यात आली आहे. तसेच लवकरच औरंगाबादलाही असेच प्राधिकरण स्थापन केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना सांगितले.