परळी, बीड : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांची मुलगी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीतल्या 'गोपीनाथ गडा'वर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सोशल मीडियावर नाराजीचा सूर व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे भाजप सोडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु, 'मी पक्ष सोडणार नाही... पक्षाला मला सोडायचंय तर पक्षानं निर्णय घ्यावा' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलंय. इतकंच नाही तर 'मी पक्ष सोडावा अशी कुणाची इच्छा आहे का? कुणी या वावड्या उठवल्या?' असं म्हणत त्यांनी स्वकीयांवर निशाणा साधलाय. 'पंकजा मुंडे पद मिळवण्यासाठी दबाव गट तयार करत आहे अशा वावड्या उठवण्यात आल्या. पण मी म्हणते, मला हे मिळू नये यासाठीच हा प्रयत्न आहे का?' असा उलट सवालही त्यांनी यावेळी केला. मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही, असं म्हणत कोअर कमिटीच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केलीय. यावेळी व्यासपीठावर, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, सूरजितसिंह ठाकरू, सुरेश धस, लक्ष्मण पवार, मोनिका राजळे, नमिता मुंडडा यांची उपस्थिती होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी बंडखोर आहे', अशी गर्जना करताना यापुढे आपण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबईत मुंडेंच्या नावानं कार्यालय सुरू करणार तसंच २७ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. हे उपोषण कुणाच्याही विरोधात नाही, तर मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी, 'घाबरू नका... मुख्यमंत्री माझा भाऊच आहे' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही साद घातलीय.  


भाषणात काय म्हणाल्या पंकजा मुंडे


- गेले दोन महिने मी काहीच बोलले नाही, भाषणाची सवय सुटलीय असं वाटायला लागलं 


- मुंडेंचा राजकीय प्रवास त्यांच्या मृत्यूनंतरही कायम 


- १ डिसेंबरला पोस्ट टाकल्यानंतर १२ दिवस फक्त याचीच चर्चा  


- पिता गमावण्यासारखं दुसरं मोठं दु:ख नाही  


- पराभवानं खचून जाणार नाही  


- माझ्याकडे सत्ता नव्हती, अधिकारी नव्हते... फाटक्या लोकांनी माझी संघर्ष यात्रा काढली  


- काही जण मुद्दाम टीका करत होते  


- मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी हे माझं भाग्य  


- मी का बंड करू आणि कुणाविरुद्ध बंड करू  


- एक-एक आमदार पक्षाला देण्यासाठी आम्ही प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं... मी पक्ष सोडणार ही पुडी कुणी सोडली? 


- मी पक्ष सोडावा अशी कुणाची इच्छा आहे का? कुणी या वावड्या उठवल्या? 


- पद मिळवण्यासाठी दबाव तयार करत आहे अशा वावड्या... पण मी म्हणते, मला हे मिळू नये यासाठी हा प्रयत्न  


- मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही 


- कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा, चंद्रकांत पाटलांकडे विनंती  


- गोपीनाथ मुंडेंचं रक्त बेईमान नाही, मी पक्ष सोडणार नाही  


- अजित पवारांनी शपथ घेतली तेव्हा सुप्रियांच्या डोळ्यातलं पाणी पाहून वाईट वाटलं... कारण तो अनुभव मीदेखील घेतला होता... पण नंतर त्याच यजमान बनून सगळ्यांचं स्वागत करताना दिसल्या 


- सुप्रिया सुळेंसोबत त्यांचे वडील होते माझ्यासोबत नव्हते  


- पक्ष कुणाचाच नसतो, प्रत्येक जण पक्ष सेवक... हा माझा पक्ष आहे... नव्हे, हा माझ्या बापाचा पक्ष आहे 


- तोंडाला कुलूप लावलेले नेते समाज घडवू शकत नाहीत  


- पंकजा मुंडे घराचा दरवाजा लावून बसणार नाही 


- होय मी बंडखोर आहे, मी महाराष्ट्रभर 'मशाल' घेऊन दौरा करणार, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार  


- मी संघर्ष करणार, काम करणार, माझ्या लोकांनी घाबरू नये  


- तुम्ही मला जे समजता तीच माझी ताकद 


- मी कधीही गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बनवा अशी मागणी केली नाही


- गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं काम करणार... मुंबईत मुंडेंच्या नावानं कार्यालय सुरू करणार 


- औरंगाबादमध्ये २७ जानेवारी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण... उपोषण कुणाच्याही विरोधात नाही 


- मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण


- मी पक्ष सोडणार नाही... पक्षाला मला सोडायचंय तर पक्षानं निर्णय घ्यावा 


- मी एका परळीची होते, आता मी राज्याची आहे


- मी सर्व समाजासाठी काम करणार... सर्व समाजाची वज्रमूठ करणार 


- मी मंत्री नाही, साधी आमदारही नाही... फक्त तुमच्यासाठी राजकारणात 


- परत एकदा काम करू, घाबरू नका... मुख्यमंत्री माझा भाऊच आहे 


 



उल्लेखनीय म्हणजे, गोपीनाथ गडावर जाण्याआधी पंकजा यांच्या परळीतल्या 'यशश्री' बंगल्यावर पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर चंद्रकांतदादा, खडसे आणि पंकजा मुंडेंमध्येही चर्चा झाली. यावेळी, 'यशश्री' बंगल्यावर भाजपाचा एक मोठा झेंडाही लावलेला दिसला. या भेटीतच, चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांचं मन वळवण्यात यश आलं आणि त्यांची शिष्टाई यशस्वी ठरली, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.