मोठी बातमी । या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत
राज्यातील काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. RRCची रक्कम थकवल्याने 6 कारखान्यांना राज्य साखर आयुक्तांची नोटीस बजावली आहे.
सागर आव्हाड / पुणे : राज्यातील काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. RRCची रक्कम थकवल्याने 6 कारखान्यांना राज्य साखर आयुक्तांची नोटीस बजावली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या कारखान्यांना आरआरसीनुसार नोटीस पाठविण्यात आली आहे.
70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे 6 कारखाने असून त्यांनी एकूण 145 कोटींची आरआरसी रक्कम थकवली आहे. वेळेत पैसे न भरल्यास मालमत्ता किंवा साखर जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
RRC म्हणजे काय?
'आरआरसी' म्हणजे रेव्हिन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट असते.'आरआरसी'चा मुद्दा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. कोणत्याही साखर कारखान्याने ऊस बिलाचे पेमेंट किंवा थकीत पेमेंटचे व्याज शेतकऱ्याला चुकते केले नसल्यास ही कारवाई केली जाते.
कोणत्या नेत्यांचे कारखाने अडचणीत?
- सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख
- पुणे- काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या संबंधीत राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड भोर, आरआरसी रक्कम २५९१.६९ लाख
- बीड - भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी - आरआरसीसी रक्कम - ४६१५.७५ लाख
- उस्मानाबाद - भाजप नेते विजयकुमार दांडनाईक यांच्याशी संबंधित जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी - आरआरसी रक्कम - ३४०.६९ लाख
- सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसआमदार मकरंद पाटील यांच्या संबंधित किसनवीर ससाका भुईंज, सातारा - आरआरसी रक्कम - ४११.९१ लाख
- अहमदनगर - भाजपआमदार बबनराव पाचपुते संबंधित साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर - आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख