गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणीमध्ये (Parbhani) गेल्या 19 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. परभणी शहरातून एकाएकी गायब झालेल्या तरुणाचा खून (Murder) झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी शहरातील अलिबाग नगरात राहणारा शेख मैनुद्दीन शेख मंजुर हा तरुण 8 जुलै पासून बेपत्ता झाला होता. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही.


त्यानंतर मैनुद्दीनच्या वडिलांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. युवकाचा शोध घेत असतांना पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्या दृष्टीने तपास करताना पोलिसांना सूत्रांव्दारे माहिती मिळाली की सदर युवकाचा शहरातील अजिजीया नगर येथे खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.


पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेवून खाक्या दाखविल्या असता शेख मैनोद्दीन यांच्या खूनाला वाचा फुटली. आरोपांनी आठ जुलै रोजी पैशाच्या कारणावरून तसेच दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याने मैनोद्दीन याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बोरवंड येथील कालव्याजवळील एका शेतात पुरला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुरलेल मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शरद जर्हाड यांच्या फिर्यादीवरून पाच आरोपींवर कोतवाली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालाय. तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली  आहे.