कैलाश पुरी, पिंपरी-चिंचवड : शरद पवारांचे नातू आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्य़ाच भाषणामुळे चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांचं पहिलं भाषण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्य़ांची निराशा करणारं ठरलं. तर विरोधकांच्या हातात मात्र या भाषणामुळे आयतच कोलीत मिळालं आहे. याच भाषणामुळे मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. पार्थ पवार यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांच्या पाठिराख्यांना निराश केलं. प्रचारातल्य़ा पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पार्थ भाषणाला उभं राहतील आणि अजित पवारांसारखी तोफ धडधडायला लागेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण पार्थ पवारांनी पहिल्याच भाषणात सपशेल निराशा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाषणाचा मुद्दा विरोधात जाणार हे लक्षात घेऊन जयंत पाटलांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पार्थ पवारांच्या भाषणावर अनेक आक्षेप घेतले गेले. पार्थ पवारांचं भाषण आंग्ल उच्चारातलं होतं. पार्थ यांनी भाषण लिहून आणलं होतं. भाषणात कार्यकर्त्यांना प्रेरीत करणारे मुद्दे नव्हते. पार्थ पवारांनी भाषणासाठी होमवर्कच केला नव्हता. पार्थ पवारांच्या या भाषणामुळे ते ट्रोल तर झालेच आहेत. शिवाय विरोधकांच्या हातातही आयता मुद्दा मिळाला आहे.


शरद पवारांच्या तालमितला हा पैलवान भाषणाच्या बाबतीत तर फारच कच्चा निघाल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. गवयाचं पोरकं सुरातच रडतं अशी म्हण आहे. पार्थ पवारांनी मात्र वक्तृत्वाबाबत कार्यकर्त्यांची निराशा केली. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी भाषणच पुरेसं नसतं. त्यामुळं निवडणुकीच्या डावपेचात पार्थ किती यशस्वी ठरणार हे निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.