अकोला : मोर्णा नदीचा काठ लोकांनी अक्षरश: फूलून गेला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गर्दीत हवशे-गवशे आणि नवशे सगळेच होते. पण इथं जास्त संख्या होती ती स्वच्छ-सुंदर मोर्णा नदीचं स्वप्नं पाहणा-यांची. मोर्णा नदी म्हणजे अकोल्याची सामाजिक भौगोलिक, ऐतिहासिक ओळख सम्रूद्ध करणारी नदी..... अकोल्याजवळच्या बार्शीटाकळी तालूक्यातून उगम पावलेल्या या नदीच्या काठावर अकोला शहर वसलंय.... कधीकाळी खळाळून वाहणारी स्वच्छ आणि सुंदर असणारी मोर्णा नदी आज मात्र गटारगंगा झालीय.


जिकडे तिकडे जलकूंभीचा हिरवा थर, प्लास्टीक, दारुच्या बाटल्या आणि अनेक ठिकाणांहून नदीत मिसळतंय प्रदूषित पाणी.... मोर्णेची ही अवस्था पाहून अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय अस्वस्थ झाले... आणि त्यातूनच जन्माला आली मोर्णा स्वच्छता चळवळ... आठवडाभरापूर्वी त्यांनी अकोलेकरांना मोर्णेला स्वच्छ करण्याची साद घातली. त्याला अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. 


मोर्णेच्या या स्वच्छता मोहिमेत अकोल्यातल्या लोकप्रतिनिधींचाही सहभाग लक्षणीय होता. अकोल्याचे पालकमंत्री डाँ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधिर सावरकर, हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवालांसह अकोल्यातले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. ही सुंदर दृश्यं आपल्यापर्यंत ही दृश्यं पोहोचवलीयत झी 24 तासचे प्रेक्षक विशाल टाले यांनी...  


या मोहिमेत स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य अकोलेकरांनी  सक्रीय सहभाग घेतला. अनेकांनी जेसीबी, ट्रैक्टर, कचरागाड्या मोफत पुरवत या मोहिमेला हातभार लावला. अलिकडे अनेक मोहिमा या उद्घाटनापुरत्याच मर्यादीत राहतात. मात्र, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संवेदनशिलतेतून जन्माला आलेली ही चळवळ याला अपवाद ठरेल, अशी अपेक्षा आहे.... अकोल्यातल्या मोर्णा स्वच्छतेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर एका शाश्वत-सकारात्मक विचारांची ही सुरूवात ठरेल....