अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात शिकाऱ्याकडून काळवीटाचं मटन विकत घेणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. आतापर्यंत शिकाऱ्यांवर कारवाईही झाली आहे. पण, मटण विकत घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा राज्यातील पहिलीच घटना असावी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावातील विजय भोसले नावाच्या शिकाऱ्याला वन विभागानं काळविटाच्या मटणासह रंगेहाथ अटक केली. भोसलेच्या घरातून काळवीटाचे मांस, चारही पायाचे खूर, कातड्याचे तुकडे, शिंगं, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर भारतीय दंडसंविधानाअन्वये काही कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इर्शाद शेख या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली. 


दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी आरोपीचे कॉल रेकॉर्ड चेक केले असता मुतन्ना कोळी आणि विष्णू बनसोडे या आणखी दोघा आरोपींचा ठावठिकाणाही सापडला. या दोघांनी भोसलेकडून काळविटाचे मटण विकत घेतले होते.


 


काळवीट, हरीण किंवा अन्य दुर्मिळ प्राण्यांची शिकार मांसविक्रीच्या मुख्य हेतूनेच केली जाते. आतापर्यंत मटण विकत घेणारे दोघेजण सापडले आहेत. पण काळविटाचं मटन खाणाऱ्यांमध्ये आणखी काही पांढरपेशे लोकही आहेत का, याचा तपास सुरू आहे.