अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूरत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी आंदोलन करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पण बाहेर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाले. फौजदार चावडी पोलीस (Faujdar Chawadi Police) ठाण्यासमोर हिंदूवादी संघटनेच्या 100-150 कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. पण आंदोलनकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस स्थानकात आणण्यात आलं. पण ही अटक चुकीची असल्याचं सांगत भिडे समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला. त्यानंतर भिडे समर्थक आणि पोलिसांची बाचाबाची झाली. जमाव पांगवण्यासाठी  पोलिसांनी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज केला. 


आम्ही केवळ आंदोलन करण्यास आलो होतो, यांसदर्भातलं निवेदन कलेक्टर यांना देणार होतो, असं भिडे समर्थकांनी सांगितलं. पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला असून ही दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा भिडे समर्थकांनी दिला आहे. काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


विरोधकांचा आरोप
दरम्यान, संभाजी भिडेंना तातडीने अटक करा, नाही तर खूर्ची खाली करा अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार संभाजी भिडेंना का पाठिशी घालतंय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. संभाजी भिडेंचा बोलविता धनी कोण आहे असा सवाल त्यांनी केलाय. तर दाभोलकरांची हत्या आम्हीच केली असं धमकी देणाऱ्या धारकऱ्याने म्हटलंय असा गौप्यस्फोट आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. धमक्या देणाऱ्यांना अटक केली जाईल असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.


दुसरीकडे संभाजी भिडे हा फ्रॉड माणूस आहे, कोणतीही नोंदणी न करता संभाजी भिडे सोनं गोळा करत आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. समाज सुधारकांचा, गांधीजींचा, साईबाबांचा अपमान करणा-या संभाजी भिडेंची जागा ही काळकोठडीतच आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. 


गृहमंत्र्यांचं निवेदन
संभाजी भिडेंच्या वादग्रस्तविधानावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. पोलिसांनी भिडेंवर गुन्हा दाखल केलेला असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपच्या आवाजाचे नमुनेही तपासले जातील असंही फडणवीसांनी सांगितलंय.