महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार, महिलांना घरापर्यंत सोडणार
नागपूर पोलिसांचं महिलांच्या सुरक्षेसाठी अनोखं पाऊल
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : हैदराबादच्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र पोलीस खडबडून जागे झाले आहेत. नागपूर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अनोखं पाऊल उचललं आहे. ज्या महिलांना कामाच्या ठिकाणाहून किंवा घरी जाण्यास उशीर झाला असेल त्यांना आता पोलिसांची मदत मिळणार आहे.
रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत जी महिला घरी जाण्यासाठी मदत मागणार, त्या महिलेला पोलीस तिच्या घरापर्यंत सोडणार आहेत. यासाठी संबधित महिलेनं १०० क्रमांकावर मदत मागायची आहे. किंवा ९८२३३००१०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.
नागपूरकर महिलांनी पोलिसांच्या या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. दिल्लीतल्या निर्भयाकांडानंतरही महाराष्ट्र पोलिसांनी अशा उपाययोजना केल्या होत्या. पण नंतर अशाप्रकारच्या योजना आपोआप बंद पडल्या. महिला सुरक्षेच्या उपाययोजना चांगल्या आहेत. पण त्यांमध्ये सातत्य राखण्याची गरज आहे.