कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : (Pune Hit And Run) पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाटच्या जखमा ताज्या असतानाच आता इथं आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आणखी एका हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानं पुणे हादरलं आहे. (Pune News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मध्यरात्री झालेल्या हीट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून, या भीषण अपघातात दुसरे कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी समाधान कोळी हे मृत्युमुखी पडले, तर संजोग शिंदे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


उपलब्ध माहितीनुसार (Mumbai Pune Expressway) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावने दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. तितक्यातच समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग दिल्याचं कळत आहे. 


कॉन्स्टोबलच्या दुचाकीला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. जिथून शिंदे यांना जखमी अवस्थेतच तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेत घटनास्थळावरून समाधान कोळी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. कोळी यांचा मृतदेह पुढं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रात्री उशिरा सदर प्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या नावे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अपघातासंदर्भातील सखोल तपासणी पोलीस यंत्रणेनं सुरू केली आहे. 


हेसुद्धा वाचा : वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैद


 


पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाच्या अनेक घटना घडल्या असून, यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धाबे दणाणून सोडणाऱ्या या वेग बहाद्दरांमुळं रस्त्यावरून चालयचीसुद्धा भीती वाटू लागली आहे, अशाच प्रतिक्रिया सध्या पुण्यातील नागरिकांनी देण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींनी अपघातप्रकरणीची शिक्षा आणि वाहतूक कायदे आणखी कठोर करण्याची मागणी उचलून धरली आहे.