सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune News) रविवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर इशरत बाग परिसरात भरधाव बसचे (brake fail) ब्रेक निकामी झाल्याने बसने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची धक्कादायक दृश्ये सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील उंड्री चौकातील एनआयबीएम रस्त्यावर इशरत बाग परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका खासगी ट्रॅवल बसचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर वेगात असलेल्या बसने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.



मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. तीव्र उतारावरच बसचा ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बसने अक्षरक्षः लोकांना चिरडले. अपघाताच्या ठिकाणी जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.



या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (37 रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, टेम्पोतील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (42) याला ताब्यात घेतले आहे.