Pune Crime : पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशातच पुण्याच्या हडपसर भागात आई आणि मुलाने वडिलांच्या निधनानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी येथे एका 70 वर्षीय वृद्धाच्या आत्महत्येनंतर महिन्याभरातच पत्नी आणि मुलानेही आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वी तिघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून आई आणि मुलगा बचावले होते. तर वडिलांचा मृत्यू झाला. मात्र सोमवारी दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई आणि मुलाने पुन्हा काही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात पतीच्या मृत्यूनंतर महिला आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील फुरसुंगी भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत घडली. पती,पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून घरी परतलेली महिला आणि मुलाने पुन्हा विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.


जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे ( वय 60) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय 41) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. 22 मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय 70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी) यांनी त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला होता. तर उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र सोमवारी दोघांनी पुन्हा विषारी ओैषध पिऊन पुन्हा आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.


आर्थिक, वैयक्‍तिक व आरोग्याच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यावेळी तपासात निष्पन्न झाले होते. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी दुपारच्या सुमारास आई आणि मुलगा त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते. प्राथमिक तपासणीत त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही घटनांच्या क्रमाची चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला." 


मे महिन्यातील प्राथमिक तपासात जनाबाई कॅन्सरशी झुंज देत होत्या आणि घटस्फोट आणि नोकरी गेल्याने चेतन तणावाखाली असल्याचे दिसून आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली. "मे महिन्यात त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना सोडण्यात आले. सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू उघडकीस येण्यापूर्वीच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसते," असे हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले.