पुणे : पुणे शहर आणि परिसरात पावसाचं अक्षरश: कहर केला. पुण्यात पावसाचा जोर एवढा होता की अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. या मुसळधार पावसात अनेकजण वाहून गेले आहेत. आतापर्यंत १० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. रोहित भरत आमले (वय 13), संतोष कदम (वय 55), सौंदलीकर (32 वर्ष) आणि त्यांचा 9 वर्षाचा मुलगा मयत आहेत. घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. केवळ पाहत राहण्यापलीकडे नागरिक काहीही करू शकले नाही. रात्री नऊ नंतर जोरदार इथे पाऊस सुरू झाला. यामुळे शहरातल्या मध्य भागातील ओढे नाले काही मिनिटात तुडूंब वाहू लागले. यामुळे दांडेकर पूल येथील वसाहत, सिहगड रस्ता, बिबवेबडी, धनकवडी, सहकारनगर, कात्रज भागामध्ये पाणीच पाणी झालं. सर्व रस्ते जलमय झाले. पाणी ओसरत चालले आहे, त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नका असे आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनांना मार्ग काढण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. पावसामुळे अनेक गाड्या बंद पडल्या तसेच मुसळधारं पावसानं गाड्या वाहून देखील गेल्या आहेत. अनेक सोसायटी, घरं आणि वसाहतीमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत हलविण्यात आलं. 



पुरंदर तालुक्यात ढगफुटी सारखा मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. बारामती तालुक्यातल्या कऱ्हा नदीला कधी नव्हे असा महापूर येण्याची शक्यताय. कऱ्हा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलाय. कऱ्हा नदीत ९० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं असं आवाहन करण्यात आलंय.