चैत्राली राजापूरकर, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Ravan Thali: विविध गोष्टींचे वर्ल्ड रेकॉर्ड होताना आपण नेहमीच पाहतो. पण एखाद्या खाद्यपदार्थ किंवा थाळीचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण आता मावळ मधील एका हॉटेलच्या थाळीची नोंद थेट वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे. या थाळीच नाव पण "रावण थाळी" असं आहे. पण आता नोंद होण्यासारख या थाळीत आहे तरी काय पाहूया.


मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील हे हॉटेल शिवराज. हे हॉटेल महाराष्ट्रभर खरं तर विविध थाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी या हॉटेलमध्ये एका तासात एकाच व्यक्तीने बुलेट थाळी संपवा आणि बुलेट घरी घेऊन जा अशी ऑफर होती. तेव्हा पासूनच या हॉटेलची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली. पण आता याच हॉटेलच्या रावण थाळीन "वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया" मध्ये सर्वात जास्त डिशेससाठी आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे.


रावण थाळीत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 32 प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. विविध भन्नाट ऑफर या हॉटेलकडून नेहमीच दिल्या जात असल्यामुळे हे हॉटेल पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यात विविध प्रकारच्या थाळ्यांमध्ये रावण थाळी, बुलेट थाळी, बकासुर थाळी, बैलगाडा थाळी, सरकार थाळी, पैलवान थाळी अशा एक ना अनेक थाळ्यांचा समावेश आहे. मात्र या थाळ्यांमधील रावण थाळीने मात्र 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये सर्वात जास्त डिशेससाठी आपल्या नावावरती विक्रम नोंदवला आहे. या थाळीमध्ये सर्वाधिक 32 मांसाहारी पदार्थ आहेत. यामध्ये चिकन, मासे, कडकनाथ चिकन, अंडी, पापड, रोटी, नान, सोलकढी अशा विविध मांसाहारी पदार्थांचा समावेश आहे. मात्र या थाळीची नोंद झाल्यानंतर याच श्रेय ही थाळी बनविणाऱ्या शेफचेच असल्याची भावना हॉटेल मालकांनी व्यक्त केली आहे


खवय्यांसाठी वडगाव मावळ येथील शिवराज हॉटेलच्या थाळ्या या नेहमीच पर्वणी ठरत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक ज्यावेळी मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी येत असतात. त्यावेळी या थाळ्यांचा आस्वाद ते नेहमीच घेताना आपल्याला पाहायला मिळत असतात. रावण थाळीची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया'मध्ये झाल्यानंतर खवय्यांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे.