गणपती विसर्जनासाठी महापौरांच पुणेकरांना आवाहन
घरगुती आणि मंडळाच्या बाप्पाचं असं होणार विसर्जन
पुणे - कोरोनाचं सावट पुण्यातही पसरलं आहे. १ लाखाहून अधिक कोरोनाबाधितांचा आकडा असलेल्या पुण्यात २ हजाराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत अगदी गणेशोत्सव काही दिवसांपूर्वी आला आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना आवाहन केलं आहे.
यंदा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच यंदा गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मंडपात न करता, गणपती मंदिरात बसवण्याचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी गणेश मंडळांना केले आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दी टाळणं आवश्यक आहे. अशावेळी सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळता यावेत आणि गर्दी टाळता यावी यासाठी घरगुती आणि सार्वजनिक गणरायाच्या विसर्जनासाठी काही नियम ठरवले आहेत. पुणेकरांनी घरगुती गणपतीचे विसर्जन घरातच करावे तर सार्वजनिक गणपतीच विसर्जन जागेवरच असं आवाहन त्यांनी दिलं आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, दरवर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, यंदा आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहोत. हा संसर्ग रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावर्षी कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येणार नसून भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर गणेशमूर्तीचे विसर्जन मंडळांच्याजवळच, तर घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन देखील महापौरांनी यावेळी केले.