Video : `...म्हणून पुण्यात मेट्रो गरजेची`; मेट्रोतील ढोलवादनानंतर `ही` अस्सल पुणेकरी प्रतिक्रिया ऐकाच
उद्घाटनानंतरही पुणे मेट्रो सातत्याने चर्चेत आहे ती पुणेकरांमुळे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पुणे मेट्रोच (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं होतं. उद्घाटनाआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मेट्रो सफारीमुळे पुणे मेट्रो जोरदार चर्चेत आली होती.
मात्र पुण्याची मेट्रोही कायमच चर्चेत असते. उद्घाटनानंतरही पुणे मेट्रो सातत्याने चर्चेत आहे ती पुणेकरांमुळे. पुणेकर कधी कुठे काय करतील याचा नेम नाही. मेट्रो सुरु झाल्यापासून त्याचा सुखकर प्रवासाठी उपयोग करण्यासोबतच पुणेकरांनी तिचा पुरेपूर वापर केला आहे.
राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातही ढोल पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र आता एका ढोल पथकाने थेट पुण्याच्या मेट्रोमध्येच वादन केलं आहे.
पुण्याच्या दुर्गा ब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे गणेशोत्सवानिमित्त तयारी करण्यासाठी मेट्रोमध्ये ढोल पथकाने वादन केलं. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे गणेशोत्सवानिमित्त सोमवारी संध्याकाळी ढोल ताशा पथकातर्फे वादन करण्यात आलं.
सोशल मीडियावर या वादनाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या वादनावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीकाही केली आहे. पुणे मेट्रोत आता फक्त भाजी मंडई सुरु करायची राहिलीये तसेच यासाठीच मेट्रो गरजेची होती अशी टीका या वादनावरुन करण्यात येत आहे.
पुस्तक प्रकाशन ते गाण्याचे प्रमोशन
याआधीही पुणे मेट्रो विविध कारणांनी चर्चेत आली होती. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा या गाण्याचे पुणे मेट्रोत प्रमोशन करण्यात आलं होतं. यावेळी पुणेकरांनी मेट्रोमध्ये चंद्रा गाण्यावर ठेका धरला होता.
तसेच पुणे मेट्रोमध्ये एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पार पडला होता. तसेच पुणेकरांनी सायकल घेऊनही मेट्रोतून प्रवास केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तसेच काहींनी तर वाढदिवसही साजरा केल्याचे पाहायला मिळाले.