`पुण्यातील ससून रुग्णालय `गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा` आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..`
Sasun Hospital Doctor Arrested: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने परस्पर बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
Sasun Hospital Doctor Arrested: पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केल्यानंतर वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी याच संदर्भातून ललित पाटील प्रकरणाचाही उल्लेख केला आहे.
डॉक्टरांचा सहभाग कसा?
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या अपघात प्रकरणामध्ये डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर या दोघांविरोधात 120 B, 467, 201, 213 आणि 213 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या कटात सहभागी होणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावा नष्ट करणे या कलमांखाली दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी कथित स्वरुपात मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याच्या रक्ताचे नमुने घेतले खरे. पण तेच नमुने चाचणीसाठी न पाठवता ते कचरा पेटीत टाकले. यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला या अल्पवयीन मुलाचे नमुने म्हणून पाठवले.
डॉ. तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. हळनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि त्याच्या मुलाच्या रक्ताचे नमुने जुळले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल जुळला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. हळनोर आणि डॉ. तावरेला अटक केली. याप्रकरणी हा चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की पाहा >> Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..
हे हॉस्पिटल गुंड, आरोपी यांच्यासाठी आहे का?
पुणे पोलिसांनी हा खुलासा केल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. "पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे? आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटलमधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे हॉस्पिटल गुंड, आरोपी यांच्यासाठी आहे का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. "ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर शिक्कमोर्तब केले," असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> 'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'
सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे
"पुणे 'हिट अँड रन' प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे," असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
रक्ताचे नमुने नसल्याने खटल्यावर परिणाम?
विशाल अग्रवलाच्या मुलाचे रक्ताचे नमुन्यांचा रिपोर्ट नसल्याने या खटल्यावर परिणाम होणार नाही असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलच्या रक्ताचे नमुने 20 तासांनी घेण्यात आले आहेत. त्यात मद्याचा अंश आढळून आला नाही. याचा खटल्यावर काही परिणाम होणार नाही. कारण आरोपीने मद्य प्राशन केल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. रक्ताचे नमुने घेणे आणि अहवालामध्ये गडबड होऊ शकते, याची शंका पहिल्याच दिवशी आली होती. त्यामुळेच औंध हॉस्पिटलला डीएनए तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.