Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..

Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 01:29 PM IST
Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्.. title=
धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणी नगर येथे 19 मे रोजी झालेल्या भीषण अपघातानामध्ये अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला आधी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतर सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांकडून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर बालन्यायालय मंडळाने जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवलं. या मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. असं असतानाच आता या अल्पवयीन मुलाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. अपघाताच्या आधीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडीओत काय दिसतं? 

हा सीसीटीव्ही व्हिडीओ एखाद्या सोहळ्याच्या ठिकाणचा दिसत आहे. या व्हिडीओत ज्या पोर्शे कारने अपघात झाला त्याच कारमधून हा अल्पवयीन मुलगा बाहेर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा मुलगा ड्रायव्हींग सीटवरुन उठून बाहेर आल्याचं कार ज्या पद्धतीने पार्क केली आहे त्यावरुन स्पष्ट होत आहे. कारमधून सूटाबुटात उतरल्यानंतर हा मुलगा चालत येत आपल्या ओळखीच्या लोकांना भेटताना दिसत आहे. 

व्हिडीओमधून काय स्पष्ट होतं?

अल्पवयीन मुलगा अपघात झाला तेव्हा पहिल्यांदा पोर्शे कार चालवत नव्हता हे स्पष्ट होत आहे. अपघात झाला त्या दिवशी तो कार चालवत होता असं पोलिसांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. सध्या समोर आलेला सीसीटीव्ही व्हिडीओ हा अपघात झाला त्या दिवसाच्या आधीचा आहे. या व्हिडीओमध्ये या मुलाचे काही कुटुंबियही दिसून येत असल्याने व्हिडीओ दुसऱ्या कुठल्या तरी प्रसंगाच्या वेळचा असल्याचं स्पष्ट होत आहे. पोर्शे कारमधून तो उतरताना दिसतोय. 

नक्की वाचा >> 'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'

...तर अपघात टाळता आला असता

वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, त्याने कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही, असं असतानाही त्याच्या घरचे लोक त्याला कार चालवायला देत होते. या पूर्वीही या मुलाला अनेकदा कार चालवायला दिली होती असं या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. वेळीच या मुलाला रोखलं असतं तर हा अपघात टाळता आला असला. तपासामध्ये पोलीस या व्हिडीओचाही समावेश करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

डॉक्टरांना अटक

या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.