पुणे : देशातील पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पुण्यात व्यापारी महासंघाने (Pune Chamber of Commerce) आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकानं दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत. तर आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


 कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र दुकानं सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला होता. आता या निर्णयात बदल केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकाने बंद न ठेवता, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघानं घेतला होता. आता यात बदल करत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. आजच्या भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 


दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी गर्दी न करता अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन अण्णांनी केले आहे. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णांनी पाठिंबा जाहीर केला आहे.