मुंबई : शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) या बंदला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे. १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत मात्र सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहणार आहे. बेस्ट बसेस ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय. खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवल्या जाणार आहेत. शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई परिसरातल्या टॅक्सीही सुरू राहणार असल्याची माहिती टॅक्सी संघटनांनी दिली आहे. तर संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाला बँक संघटनांनी पाठींबा दिला आहे. मात्र आज पुकारलेल्या भारत बंद दरम्यान बँका सुरूच राहणार आहेत. 'भारत बंद'मध्ये बँकांचा सहभाग असणार नाही. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरुच राहाणार आहेत.
आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघानं घेतलाय. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र कोरोनामुळं आधीच अतोनात नुकसान झालंय. त्यामुळं दुकानं बंद न ठेवता, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.
आजच्या भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे एक दिवसाचं उपोषण करणार आहेत.. आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी गर्दी न करता अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन अण्णांनी केले आहे. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
भारत बंद आधी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांसाठी निर्देश जारी केलेत. आपापल्या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलंय. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी असेही निर्देश दिले आहेत.