सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  ऑनलाइन (Online) ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची (Extortion) मागणी केल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार पुण्यात (Pune) उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेला 25 वर्षीय तरुण हा धनकवडीत राहत होता. या तरुणाने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये (Information Technology Act) सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (pune young man end life after woman blackmail)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढला. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तिने तरुणाला दिली. त्यानंतर तरुणाने तिला ऑनलाइन साडेचार हजार रुपये पाठवले होते.


त्यानंतरही तरुणीने तरुणाला धमकावणे सुरुच ठेवले होते. अखेर तरुणाने, ''मैं सुसाईड करा रहा हूँ'', असा मेसेच तरुणीला पाठवला. त्यावर तरुणीने ''करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हिडीओ व्हायरल कर रही हूँ'', अशी धमकी देऊन पुन्हा पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे तरुणाने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर आता सोमवारी तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


दरम्यान, मुंबईत एक व्यक्ती ऑनलाईन फसवणूकीला बळी पडला. वांद्रे येथील एका सेवानिवृत्त सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला 'सेक्स्टॉर्शन' घोटाळ्यात 17.70 लाख रुपये गमवावे लागले. जेष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, 64 वर्षीय सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने 20 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा संपर्क साधला आणि नंतर ब्लॅकमेल केले.


या जेष्ठ नागरिकाला  एका अज्ञात महिलेचा व्हॉट्सअॅप मेसेज आला ज्यामध्ये तिने स्वत:ची गुजरातमधील पूजा शर्मा अशी ओळख सांगितली आणि  व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केले. त्यानंतर महिलेने व्हिडिओ कॉल केला ज्यामध्ये ती नग्न होती. तिने तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आणि काही सेकंदात, तिने त्या जेष्ठ व्यक्तीला पाठवला. त्यानंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे जेष्ठ व्यक्तीला 17.70 लाखांना गंडा घालण्यात आला.