नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणेकरांना वाहतुकीची कोंडी नवी नाही. वाढत्या पुण्याबरोबर वाहतुकीची ही समस्याही वाढत चाललीय. मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी नवनव्या उपाययोजनाही पुढे येत आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने टॉमटॉमशी करार केलाय. टॉमटॉमने पुण्यातील वाहतुकीचा दोन वर्षांचा डेटा जमा केलाय. या माहितीच्या आधारे वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणांची कोंडी सुटण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. तसंच वाहतुकीची लाईव्ह माहितीही उपलब्ध होणार आहे. सोशल मीडियावरून तसंच शहरात लावलेल्या १६१ स्क्रीनवरून ही माहिती दिली जाईल, असे स्मार्टसिटीचे सीईओ राजेंद्र जगताप यांनी सांगितले.


वाहतुकीवर लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक पोलिसांचं चौकाचौकातल्या सीसीटीव्हीवरून वाहतुकीवर लक्ष आहेच. या सीसीटीव्हीतून केवळ चौकाचौकातली वाहतूक कळते आहे. मात्र आता टॉमटॉमच्या माध्यमातून संपूर्ण रस्त्यावरच्या वाहतुकीवर लक्ष ठेवता येणार आहे. त्याचा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.


प्रत्यक्षात काय ?


स्मार्ट सिटी, टॉमटॉमसोबत महापालिका आणि वाहतूक पोलीसही वाहतूक स्मार्ट करण्याच्या योजनेत सहभागी असणार आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाप्रमाणेच ही योजनाही स्मार्ट आहे. आता प्रत्यक्षात ही स्मार्ट पद्धतीने राबवली जाते का हे लवकरच समजेल.