Raigad Irshalwadi Landslide Latest News: मंगलवारपासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोर धरण्यास सुरुवात केली त्या क्षणापासून त्यानं उसंत घेतली नाही. बुधवारीसुद्धा राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली तर काही भागांना त्याचं रौद्र रुप पाहावं लागलं. राज्यात पावसाचा जोर वाढत असतानाच रायगडमधील इरसाल गडाजवळील (Irshalwadi Village in Raigad) आदिवासी वाडीवर दरड कोसळून एक भीषण दुर्घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी ठाकूरवाडीवर ही दरड कोरळली असून यामध्ये 4 गावकऱ्यांचा आणि बचावकार्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू ओढावला आहे. इथं 25 हून अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली असून त्यातून जवळपास 75 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे. मोरबे धरणाच्या वरील बाजूस ही वाडी असून, इर्शाळगड हा परिसर अनेक ट्रेकर्सच्या आवडीचा. पण, ता मात्र इथं निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत आहे.  


दरड कोसळण्याची ही घटना अतिशय भीषण असून यामध्ये अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला एनडीआरएफ आणि इतर पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, एका व्यक्तीला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. दरड कोसळलेल्या ठिकाणी सध्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेसह अनेक रेस्क्यू टिम कडून बचाव व मदत कार्य सुरू करण्यात आली आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी



पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी, दादा भुसे, गिरिश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मागोमागच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घटनास्थळी दाखल झाले. तिथं आदिती तटकरे यांच्याकडूनही कडूनही प्रशासनासह बचावकार्य करणाऱ्या पथकांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या संकटसमयी रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अग्निशमन दल, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून आरोग्य यंत्रणा, रूग्णालये, रूग्णवाहिका तैनात असल्याचं चित्र घटनास्थळी पाहायला मिळत आहे. 


रात्रीच्या अंधारात वाडी दरडीखाली...


रात्री उशिरानं दरड कोसळल्यामुळं या भागात बचाव कार्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. पण, गुरुवारी सकाळी मात्र दरड हटवण्याचं काम प्रचंड वेगानं सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 20 ते 25 जणांना दरडीखालून बाहेर काढलं गेलं आहे. 


रात्री साडेअकरा च्या सुमारास जेव्हा वाडी झोपी गेली असतानाच इथं काही मुलं मात्र मोबाईलवर गेम खेळत होती. तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी लगेचच डोंगरमाथ्यावरून दरड कोसळल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली. ज्यानंतर तातडीनं सूत्र हलवण्यात आली. डोंगराळ भागात ही दरड कोसळल्यामुळं तिथपर्यंत बचावकार्य पोहोचवण्यास काही अडचणी आल्या. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळं या भागात पहिल्यांदाच दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.