Raj Thackeray On Actress Sulochana Death: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana) यांचं प्रदीर्घ आजाराने (Sulochana Latkar Passes Away) निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्ट लिहित दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.


काय म्हणाले राज ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे. 


हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण 'आई' पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या. 


सुलोचना दिदींच्यात 'आईपण' हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य. 
एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. 


अशी 'आई' होणे नाही, अशी 'दीदी' होणे नाही. सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.


पाहा पोस्ट 



दरम्यान,  अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मराठा तितुका मेळवावा या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते.