शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया
Rajya Sabha elections : Sanjay Raut on BJP : राज्यसभा निवडणुकीत भाजपने आपल्या तीनही जागा निवडून आणल्यात. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई : Rajya Sabha elections : Sanjay Raut on BJP : राज्यसभा निवडणुकीत भाजपने आपल्या तीनही जागा निवडून आणल्यात. राज्यसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीची 9 ते 10 मतं मिळवण्यात यश आलं आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला. शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजपने आमिषं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हा विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं संजय पवार यांना होती. मोठा विजय झाला वगैरे चित्रं भाजपने निर्माण केलंय पण असं काही नाही, असा टोला संजय राऊत यांनी मारला आहे.
कोणाचा पराभव झाला, असा सवाल उपस्थित करत पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं संजय पवार यांना पडलीत असे ते म्हणाले. मोठा विजय झाला, हे चित्र उभे केले जातंय. काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाही, ते आम्हाला माहीत आहे. त्यांना विजय मिळाला, अभिनंदन.
आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे केले. त्यांची व्यूहरचना उत्तम केली होती. आमिषे, केंद्रिय यंत्रणांचा वापर केला गेला. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं. निवडणूक आयोगाने त्यांना प्राधान्य दिले. आम्हीही दोघांविरोधात तक्रार केली होती. पण दखल नाही घेतली, असे राऊत म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली. 'ईडीचा डाव फसला, रडीचा डाव सुरु, असे सांगत संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला मतदान केले, असा दावा राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तर कुठे गणित चुकलं याचा अभ्यास करावा लागेल असं काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.