मुंबई : अयोध्या निकाल तथ्यावर नव्हे तर भावनांवर देण्यात आल्याची टीका बहुजन वचिंत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार आयोध्येत होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल संस्कृती हे इतिहासकार आहे. अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद म्हणजे प्रयागराज उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर म्हणजे राम मंदिराच्या बाजूने लागल्याचे आंबेडकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातही इतिहास आणि पुराव्यांना ग्राहय धरले नसल्याचे ते म्हणाले. 


अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे हे अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. सद्य परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज असून आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगायला हवे होते. असे झाले असते तर भारतीयांकडे कोणी संशयित नजरेने पाहीले नसते असे ते म्हणाले.



कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.


'बौद्ध-आंबेडकरींनी एकत्र या'


अयोध्येतील बुद्धविहार हा बौद्ध बांधवांचा हक्क आहे. यासाठी प्राणाची आहुती देण्यास ही बौद्ध बांधवांनी मागे पुढे पाहू नये. तसेच बुद्धविहार गट तट विसरून सर्व बौद्ध-आंबेडकरी नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आनंद शिंदे यांनी केले.


आठवलेंची मागणी


केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनीही अयोध्येत महाबुद्धविहार बांधण्याची मागणी उचलून धरली आहे. भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मशीद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर-मशिदीचा वाद कायमचा मिटला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे.


अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे तसेच मशिदीला ही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.