`आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे`
`काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.`
जालना : शिवसेना बाहेर काहीही बोलत असली तरी वाद बाहेर होतात. मंत्रिमंडळातील निर्णय सर्वसंमतीने होतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. भाजप युतीच्या बाजूने आहे. हे आम्ही जाहीरपणे सांगतो आहे, असेही दानवे म्हणालेत.
आदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य
शिवसेनेच्या भाषेवर आमचे ऑब्जेक्शन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युतीसंदर्भात कोणताही नवा प्रस्ताव नाही. फक्त बसायचे आणि युतीची घोषणा करायची इतकेच बाकी आहे. मात्र युती करायची की नाही हे शिवसेनेवर अवलंबून असल्याचेदेखील दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे. मात्र, शिवसेनेने वेळोवेळी युतीबाबत भाष्य केले आहे. युतीचे नंतर बोलू आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. कर्जाचे काय झाले, अशी विचारणाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच दानवे यांच्यावर जोरदार टीका केली होती. असे असताना दानवे यांनी पुन्हा युतीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याचीच चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.
युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा : उद्धव ठाकरे
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेलाही रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंच काय जयंत पाटीलही भेटू शकतात. काही कामासाठी भेटले, असतील असे म्हणत दानवे यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. आम्ही प्रत्येक निवडणुकीत सगळ्यांना पुरून उरलो आहे. यापुढील निवडणुकीत सगळ्यांना चारीमुंड्या चित करु, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना लगावला आहे.