नागपूर :  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे 36 दिवसानंतर नागपूर विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळावर मोठी गर्दी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचणे म्हणजे राजद्रोह आहे का? असा सवाल विचारत राणा दाम्पत्य यांनी नागपूर रामनगर इथल्या प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचं पठण केलं. नागपुरातल्या पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठणआणि आरती केली. 


विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनीही याच मंदिरात हनुमान चालिसा पठण केलं. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राणा दाम्पत्य आमने सामने येण्याची शक्यता होती. मात्र राणा दाम्पत्य हनुमान मंदिरात पोहोचण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन संपलं होतं.  


रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
यावेळी आमदार रवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हनुमान मंदिरात आज आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण श्रीराम आणि बजरंगबलीच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सुखशांती नांदो अशी प्रार्थना केल्याचं आमदार रवी राणा यांनी यावेळी म्हटलं.


हनुमान चालिसा वाचणं ही हिंदूंची संस्कृती आहे.  महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सध्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या काळात रामभक्त, हनुमान भक्त राज्य सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही अशी टीकाही रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर केली.


'महाराष्ट्रातून शनी दूर झाला पाहिजे'
तर महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे,  शेतकऱ्यांना अच्छे दिन आले पाहिजेत,  लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रातून शनी लवकरात लवकरत दूर झाला पाहिजे त्यासाठी आम्ही संकटमोचक मंदिरात साकडं घातल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं.


आम्ही दिल्लीत हनुमान चालिसा म्हटली तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात हनुमानाचा एवढा तिरस्कार का केला जातोय?, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.