धक्कादायक! पत्नीचा राग चिमुकल्या मुलांवर काढला; विहीरजवळ गेला अन्...
Sambhaji Nagar Crime : संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. पत्नीवरील राग मनात ठेवून दारुड्या पतीने मुलांसोबत केलेल्या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (sambhaji nagar crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका निर्दयी बापाने आपल्या पोटाच्या दोन मुलांना विहीरीत फेकून दिल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. या घटनेत एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. दारुड्या बापाच्या या कृत्याने संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगर पोलिसांनी (Sambhaji Nagar Police) या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे.
दारुच्या मुलांना विहीरीत फेकून दिले
छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजू प्रकाश भोसले असे निर्दयी बापाचे नाव असल्याचे समोर आले आहे. मद्यपी असलेल्या श्रेयस भोसले याने शुक्रवारी दारुच्या नशेत दोन्ही लहान मुलांना विहीरीत फेकून दिले. या घटनेत 7 वर्षीय बालकाचा जीव गेला असून 9 वर्षीय मुलाला वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानंतर श्रेयस भोसलेला अटक करण्यात आली आहे.
रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने सोडलं घर
दारूच्या व्यसनामुळे राजूचे रोज पत्नीसोबत भांडण व्हायचे. या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी दोन्ही मुलांना पतीकडे सोडून निघून गेली होती. राजू भोसले हा आई वडिलांसह दोन मुलांसोबत चौधरी कॉलनीत राहत होता. राजू चिकलठाणा येथे वेल्डींगचे काम करुन घर चालवत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन लागल्याने पत्नीसोबत त्याचे खटके उडू लागले. यामुळे दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी मुलांना त्याच्याकडे सोडून माहेरी निघून गेली होती. याचाच राग राजूच्या मनात होता.
मुलांना विहीरीत फेकलं अन् गाठलं घर
शुक्रवारी राजू संध्याकाळी घरी आला. त्यानंतर रागाच्या भरात दोन्ही मुलांना राजूने घराजवळ असलेल्या विहीरीजवळ नेले आणि फेकून दिले. त्यानंतर राजू घराकडे निघाला. विहीरीत पडलेल्या मुलांचा आवाज ऐकून जवळच राहणाऱ्या एका व्यक्तीने थेट विहीरीत उडी घेतली. त्या व्यक्तीला एका मुलालाच वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने दुसऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् तपास सुरु केला. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरु होता.