अमरावती : राज्यातल्या वाळू माफियांचा हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाळू माफियांनी चंद्रपूर आणि अकोल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वेच्या तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला केला आहे. तहसीलदार अभिजीत नाईक हे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीवर वाळूचा डंपर चढवण्यात आला. या हल्ल्यात नाईक जखमी झाले असून त्यांच्या गाडीचाही चुराडा करण्यात आला.


नाईक यांच्यावर चांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुरू आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झालीय. वाळू माफियांवर सरकारची जरबच नसल्याचं गेल्या काही दिवसांत घ़डलेल्या घटनांमधून समोर येतंय. त्यामुळे वाळू माफियांवर कडक कारवाई कऱण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.