संघर्षाला हवी साथ : चहाच्या टपरीवर काम करत पटकावले ९४.४० टक्के
कष्टाला सातत्याची जोड दिली तर हमखास यश मिळवता येतं. याचं आदर्श उदाहरण म्हणजे उस्मानाबादचा तन्मय शिराळ... वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तन्मयनं यंदा दहावीला ९४.४० टक्के गुण मिळवलेत... पण भविष्यातील वाटचालीसाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...
महेश पोतदार, झी मीडिया, उस्मानाबाद : कष्टाला सातत्याची जोड दिली तर हमखास यश मिळवता येतं. याचं आदर्श उदाहरण म्हणजे उस्मानाबादचा तन्मय शिराळ... वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तन्मयनं यंदा दहावीला ९४.४० टक्के गुण मिळवलेत... पण भविष्यातील वाटचालीसाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...
उस्मानाबाद शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेतल्या एका चहाच्या टपरीवर आपल्या वडिलांना तन्मय अंगद शिराळ मदत करताना दिसतो... शाळा सुटल्यावर दररोज या टपरीवर येऊन चहा बनवणं, चहाचे ग्लास स्वच्छ करणं, ग्राहकांना त्यांच्या दुकानात चहा नेऊन देणं, ही काम तन्मय करतो... उरलेल्या वेळेत, संध्याकाळी घरी जाऊन अभ्यास करायचा... त्याच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळालं... या चहावाल्या मुलानं दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवले... वडिलांच्या कष्टाचे सार्थक करायचंय... आयआयटी इंजिनियर होऊन घरची परिस्थिती बदलायचीय, असं तन्मय म्हणतोय.
उस्मानाबाद शहरातील उंबरे कोठा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये शिराळ कुटुंबियांचा गरीबीशी संघर्ष सुरूय... अंगद शिराळ चहाच्या टपरीतून मिळणा-या उत्पन्नातून कसाबसा उदरनिर्वाह चालवतात. तर सुरेखा शिराळही मोलमजुरी करून त्यांना हातभार लावतात. मुलाच्या पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा, अशी चिंता त्यांना आता सतावतेय...
तन्मयचं शालेय शिक्षण समता माध्यमिक विद्यालयात झालं. तन्मयची अभ्यासातली हुशारी, गुणवत्ता आणि घरची हलाखीची परिस्थिती पाहून शाळेतील शिक्षकांनाही सुरवातीपासूनच त्याला मदत केली. दररोज शाळेत येण्यासाठी त्याला शाळेनं पूर्वी सायकलही भेट दिली होती.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, तन्मय शिराळनं मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आयआयटी इंजिनिअर होण्याचं त्याचं स्वप्न साकारण्यासाठी गरज आहे ती आर्थिक पाठबळाची... तुम्ही मदत केलीत, तर त्याच्या पंखांना नक्की बळ मिळू शकेल...
या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा...
संपर्कासाठी :
झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३
संपर्क : 022 - 24827821
ई-मेल : response.zeemedia@gmail.com