Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!
Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Maharashtra MLC Election Result 2023 : राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा (Nashik Graduate Constituency election) निकाल हाती लागला आहे. सर्वात रोमांचक अशा निवडणुकीत सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने (MVA) समर्थन दिलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला. विजय दृष्टीपथात असतानाच सत्यजित तांबेनी जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे आनंदोत्सव साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. (Satyajeet Tambe Won Nashik Graduate Constituency election maharastra politics marathi news)
काँग्रेसकडून (Congress) एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजित यांना भारतीय जनता पार्टीने (BJP) पाठिंबा दिला. तर आधी भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील (Shubhagi Patil) यांना शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता निकाल समोर आला आहे.
सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं. शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराभव झालाय.
दरम्यान, दुसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे आघाडीवर होते. सत्यजित तांबे यांना 31009 मतं तर, शुभांगी पाटील यांना 16316 मतं होती. तर तिसऱ्या सामन्यात सत्यजित तांबे यांना 45607 तर, शुभांगी पाटील यांना 24927 मतं मिळाली होती. त्यानंतर आता सत्यजित तांबे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) काँग्रेसला मामा बनवलं?
आजाराचं कारण देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसच्या प्रचारापासून चार हात लांब केला. बाळासाहेब थोरात प्रत्यक्षात प्रचारात कुठंही नसले तरी काँग्रेसची आणि थोरातांची संपूर्ण यंत्रणा सत्याजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या पाठीशी होती, हे सर्वांना लक्षात आलं असावं. त्यामुळे थोरातांनी भाच्याला जिंकवून काँग्रेसला मामा (Mama) बनवलं का?, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय.