PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; `पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य`
राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे.
PM Narendra Modi Vs Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतं द्या असे म्हणत मोदींनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना शरद पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? असा सवालच शरद पवार यांंनी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षाचे लोक एकत्र आलेत, ही गोष्ट काहींना पचत नाही. त्यामुळंच असे आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशा समोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे असं शरद पवार म्हणाले.
शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात - शरद पवार
पंतप्रधान मोदी यांनी शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला मी कधी शिखर बँकेचा सदस्य नव्हतो. मी कधीच कर्ज घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत योग्य आहे? इरिगेशनच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही. पंतप्रधान यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेलेआहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे.
विरोधक एकत्र आल्याने मोदींचे आरोप
परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिलाय. भ्रष्टाचार करणा-यांना जेलमध्ये पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केला. पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
मोदींच्या आरोपांवर संजय राऊत यांचा पलटवार
भाजपसोबत असलेल्या महाराष्ट्रातल्या मंत्री आणि नेत्यांनी एक लाख कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का?असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.