Sharad Pawar On Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांमुळे भ्रष्टाचार वाढला अशी टीका देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला शरद पवारांनी अमित शाहांच्या भूतकाळावर बोट ठेवत कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. छत्रपती संभाजी नगरमधील एका पुस्तक प्रकाशानच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवारांनी गृहमंत्र्यांवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. 


अमित शाह कधी आणि काय म्हणाले होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवडाभरापूर्वी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी अमित शाह महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी दिलेल्या भाषणामध्ये अमित शाहांनी, "भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके शरद पवार आहेत," अशी टीका केली होती. "शरद पवारांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम केलं," अशी घणाघाती टीका शाहांनी केली होती.  शाह एवढ्यावरच न थांबता त्यांनी मराठा आरक्षणावरुनही शरद पवारांना लक्ष्य केलेलं. "जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं. जेव्हा शरद पवारांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं. 2024 ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं. 2019 ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं. तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते," असं अमित शाह म्हणाले होते. 


शरद पवारांचं अमित शाहांना उत्तर


शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी या टीकेला उत्तर दिलं. "आठ दिवस आधी अमित शहा माझ्याबद्दल बोलले. देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे सुभेदार आणि प्रमुख शरद पवार आहेत, असं ते म्हणाले. ज्यांना गुजरात दंगलीप्रकरणी कोर्टाने तडीपार केलं ती व्यक्ती देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. या लोकांच्या हातात सरकार आहे. हे लोक चुकीच्या दिशेने देशाला घेऊन जातील. त्यामुळे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे," असा टोला शरद पवारांनी लगावला.


नक्की वाचा >> 'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'


पुस्तकाबद्दल काय म्हणाले पवार?


डॉ. मकदूम फारुकी यांनी शरद पवारांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाचे प्रकाशन ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते हज हाउस येथे शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. "हे पुस्तक माझ्याबद्दल होत ते आज तुमच्यासमोर ठवण्याचे काम फारुक अब्दुल्ला करणार होते. माझ्याबद्दल इथे खूप काही चांगलं बोललं जातं. हे पुस्तक 10-12 वर्षापूर्वी लिहिलं होत. त्याचे अनेक आवृत्त्या निघाल्या आहे. आज काय घडतंय हे लिहीन गरजेचं आहे. एका प्रकारच संघर्ष करण्याची वेळ आली होती," असं शरद पवार पुस्तकाबद्दल म्हणाले.


नक्की वाचा >> 'माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणाले होते, मात्र...'; पवारांच्या विधानाची चर्चा


आमदार राजेश टोपे, शेषराव चव्हाण, अंकुशराव कदम, डॉ. अब्दुल रशीद मदनी, इलियास किरमानी, ख्वाजा शरफोद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.