पालघरमधील पराभवानंतर शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक
उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत पराभव झावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा येथे पराभव झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहाणार आहेत. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मुलगा आपल्या गळाला लावून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. तर भाजपने काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली.
पालघर पोटनिवडणूक राजेंद्र गावित यांचा ४४ हजार मतांनी विजय झाला आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना २ लाख ३७ हजार मतं पडली आहेत. गावित यांना २ लाख ६३ हजार मतं पडली आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय झाला असल्याचं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये भाजपने जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना पराभवाची कारणं शोधत असेल. मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. यानंतर या निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.