संजय राठोड यांना मंत्रिपद, खासदार भावना गवळींची उघड नाराजी
संजय राठोड ह्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळात विदर्भातून शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री म्हणून यवतमाळच्या दिग्रसचे आमदार संजय राठोड यांचा समावेश झाल्याने शिवसेना खासदार भावना गवळी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम विदर्भात हे पद अकोला किंवा बुलढाणाला द्यायला पाहिजे होतं. त्याबाबत इथल्या खासदार आणि आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे निवेदन देखील दिलेलं होतं मात्र त्याची दखल घेतल्या गेली नसल्याने आपण नाराज आहोत.असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.
खासदार गवळी आणि संजय राठोड यांच्यातील वाद लोकसभा निवडणुकीपूर्वीच विकोपाला गेला होता. त्यावेळी थेट मातोश्रीवर बैठकीतून वाद शमला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि पुन्हा या दोन नेत्यांमध्ये धुसफूस सुरु झाली. त्यात गवळींचा एक गट राठोडांच्या तंबूत गेल्याने खासदार भावना गवळी यांनी यवतमाळ जिल्ह्याकडे पाठ फिरविली.
संजय राठोड ह्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. यवतमाळ जिल्ह्यातील तीनही जिल्हाप्रमुखांनी मात्र राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने आनंद व्यक्त केला. विदर्भात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी संजय राठोड हे शिवसेनेचे एकमेव मंत्री आहेत. अशात त्यांना विरोध वाढल्याने विदर्भात शिवसेनेचे नुकसान होण्याची भीती शिवसैनिकांना आहे.