Sanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक फोटो, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) कारवाईचा मागणी केली आहे.
Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक फोटो ट्वीट केला असून यानंतर खळबळ माजली आहे. कारण या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी येथे ही घटना घडडली आहे. भाजपाच्या गुंडांनी 5 मार्चला तिच्यावर हल्ला केला असून ती पारधी समाजाची आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळी त्यांनी फडणवीसांना केलं आहे.
"देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत," असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
नेमकी घटना काय?
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर आरोपींनी तिच्या कुटुंबीयावर हल्ला केला होता. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता. या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विधान परिषदेतही या घटनेचा उल्लेख झाला होता. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या घटनेवर भाष्य करत न्याय देण्याची मागणी केली आहे.