`महोदय आता काय करणार?` संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल
Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं.
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच दुफळी माजल्यानंतर राऊतांनी केलेल्या या पत्रव्यवहारानं संपूर्ण राज्यासह राज्य शासनाच्याही नजरा वळवल्या आहेत.
मुख्यमंत्री महोदय...
महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य विभागातील कारभारावर कटाक्ष टाकत राऊतांनी काही मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. 'महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. आज काय सुरू आहे? आरोग्य अधिकाऱ्यांना आपल्या "बॉस" ला खंडणी द्यावी लागते. पैसा बोलतो. पैसाच काम करतो अशी आपल्या आरोग्य खात्याची भयंकर अवस्था आहे. आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे. मुख्यमंत्री महोदय आता काय करणार?', असा सवाल त्यांनी केला आहे.
पत्रात राऊत म्हणतायत...
राज्यातील आरोग्य विभागामध्ये सध्या कमालीचा गोंधळ निर्माण झाला असून नागरिकांच्या जगणयामरण्याचा प्रश्न इथं उदभवतो आहे असं ते म्हणाल. सध्या आरोग्य विभाग अनियमित बदल्या, बढत्या आणि आर्थिक उलाढालींचा विभाग झाल्याची बाब प्रकाशात आणत आपल्यासमोर पुराव्यांसह हे प्रकारा उघडकीस आले असून, त्यामुळं राज्याची प्रतिमा मलिन होत असल्याचं राऊतांनी अधोरेखित केलं.
महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयं एका बेडसाठी 1 लाख रुपये आकारतात. थोडक्यात या योजनेमध्ये बोगस लाभार्थींची संख्या मोठी असून, खोटी बिलं, खोटे रुग्ण यावरची कोट्वधींची रक्कम संबंधित मंत्र्यांपर्यंत जाते असा दावा राऊतांनी पत्रातून केला आहे.
हेसुद्धा वाचा : '..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
सध्या आरोग्य विभागात संचालकरपदाच्या जागा रिक्त असूनही त्यावर रितसर भरती न करता या जागांचा सौदा करण्याची मंत्र्यांची योजना असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी या पत्रातून करत अनेक प्रकरणं उघडकीस आणली. नाशिक, लातूरपासून जळगावपर्यंतचे संदर्भ देत त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या नावांचाही यामध्ये उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांनी जबाबदार व्यक्तीचं नाव सुचवावं, त्या व्यक्तीकडे मी पुरावे सुपूर्द करेन असं सांगत आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी ही मागणी राऊतांनी उचलून धरली.