'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'

Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 6, 2023, 08:28 AM IST
'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..' title=
जाहीर सभेत बोलताना केलं हे विधान (फाइल फोटो)

Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. याच वादामध्ये आता नव्याने भर पडली असून मंगळवारी वाशिममध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना लोळवणार असल्याचं म्हटलं आहे. जारी सभेत भाष करताना जरांगेंनी भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळांना नाही लोळवलं तर नाव बदलणार अशी प्रतिज्ञा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत घेतली आहे. जरांगे यांनी हे विधान करताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांचं समर्थन केलं. 

...तर नाव बदलून ठेवीन माझं

"जशास तसं उत्तर देण्यास भाग पाडू नका असं मी तुम्हाला विनंती करुन सांगतोय. मी ही विनंती सामन्य ओबीसी बांधवांनाच करु शकतो," असं जरांगे पाटील जाहीर सभेत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी भुजबळ यांचा थेट उल्लेख टाळला मात्र एकेरी उल्लेख करताना त्यांनी सूचक पद्धतीने विधान केलं. "त्याला नाही (करणार विनंती) त्याला नीटच करणार आहे मी. सोडणार नाही. त्याला सुट्टी नाही. त्याला जर नाही लोळवलं ना तर मी माझं नाव बदलून ठेवीन," असं जरांगे-पाटील यांनी जाहीर सभेत म्हटलं.

'भुजबळांना भडकवायच्या आहेत दंगली'

यानंतर पुढे बोलताना थेट छगन भुजबळांचा उल्लेख करत जरांगेनी टीका केली. "24 डिसेंबपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. कितीही अपमान केला तर पचवा, सहन करा आणि शांतता ठेवा. माझा फक्त एवढा शब्द पाळा. त्यांना त्या छगन भुजबळला फक्त जातीय दंगली भडकवायच्या आहेत. आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. आपल्याला शांतता ठेवायची आहे. एकदा आरक्षण मिळू द्या. याच्यात किती दम आहे बघायचं आहे आता," असंही जरांगे यांनी छगन भुजबळांना आव्हान देताना म्हटलं आहे.

सुनावणी आणि हैदराबाद दौरा

मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटीव्ह पिटीशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या पिटीशनच्या माध्यमातून कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यावरच आज सुनावणी होणार आहे. दुसरीकडे कुणबी नोंदी मिळवण्यासाठी आज शिंदे समिती हैदराबादला रवाना होणार आहे. शिंदे समिती हैदराबाद दौऱ्यामध्ये निजामकालीन कागदपत्रं तपासणार आहे.