Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: राज्यात युती तुटल्यानंतर आणि शिंदेंनी (Eknath Shinde) बंड पुकारत भाजपासोबत (BJP) सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजकीय नात्यात दुरावा आला आहे. जाहीर सभांमधून दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. मात्र त्यातच आज दोन्ही नेते विधानभवनात एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसत, गप्पा मारत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान या चर्चांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असून एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. सभागृहात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेचे बाण मारले जात असताना सभागृहाबाहेर वेगळचं चित्र पाहायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केला आणि सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. यानंतर आता दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चाही रंगली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.


फडणवीसांची भेट योगायोग होता का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले "पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी होते असं म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी बंद दाराआड चर्चा झाली तर बोलू". 


दरम्यान हे युतीचे संकेत आहेत का? असं विचारलं असतं त्यांनी सांगितलं की "आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केलं. कोणाला हाय, हॅलो म्हणणंही आता पाप झालं आहे का? हेतूपरस्परच अशा गोष्टी कराव्यात का?"


राज ठाकरेंना उत्तर -


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले "मी ते भाषण ऐकलेलं नाही. गेल्या 18 वर्षापासून ती रेकॉर्डिंग घासुन पुसून सुरु आहे. गेल्या वर्षी बीकेसीत मी एक मत मांडलं होतं. तेव्हा मी चित्रपटाचा दाखला दिला होता, तोच तुम्ही पुन्हा पाहू शकता". 


राज ठाकरेंनी माहिममध्ये समुद्रात दर्गा बांधल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने तिथे तोडक कारवाई केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की "हे बांधकाम काही नव्हतं. स्क्रिप्ट आल्याप्रमाणे तो बोलले असतील. अन्यथा एवढी वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होते. अशा अनेक गोष्टी राज्यात असली तर त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल".


"मराठी भाषा भवनची एक वीटही रचलेली नाही" 


 


"मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. आपल्या मातृभाषेचं एक दिमाखदार भवन राजधानीत असावं यासाठी गेल्या गुढीपाडव्याला भूमीपूजन केलं होतं. पण एक वीटदेखील रचली गेली नाही. पण आता तिथे आणखी काही कार्यालयं, वास्तू उभा करण्याचा मनोदय आहे. त्यानिमित्ताने आज झालेल्या बैठकीत आम्ही आमची मतं मांडली आहे. मंत्र्यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे," अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.